Milk Adulteration : दूध भेसळ रोखण्यासाठी कठोर कायदा करणार-राधाकृष्ण विखे-पाटील
अहमदनगर : दूध भेसळ (Milk Adulteration) मोठ्या प्रमाणात होत असून ती रोखण्याचे मोठे आव्हान आमच्यापुढे आहे. त्यामुळे दूध भेसळ रोखण्यासाठी कठोर कायदा (Act For Milk Adulteration) सरकार करणार आहे,’’ असे महसुल व पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांनी सांगितले.‘‘प्रदर्शनातून नवीन तंत्रज्ञान कळते. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाप्रमाणे राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांनी एकत्र येऊन ‘कृषी महा एक्स्पो’ घ्यावा,’’ असे आवाहन त्यांनी केले.शिर्डी   येथे राज्यस्तरीय पशुप्रदर्शन (महापशुधन एक्स्पो 2023) ला शुक्रवारी (ता.२४) विखे-पाटील यांच्या हस्ते प्रारंभ झाला. अध्यक्षस्थानी कृषिमंत्री अब्दुल सत्तार होते.
खासदार सुजय विखे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे, माजी मंत्री अण्णासाहेब मस्के, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आशिष येरेकर, पुणे जिल्हा दूध संघाच्या अध्यक्ष केशर पवार उपस्थित होत्या.
राधाकृष्ण विखे म्हणाले, ‘‘शासन सेंद्रिय शेतीला प्राधान्य देत आहे. मात्र पशुधनाशिवाय सेंद्रिय शेती नाही. लम्पी स्कीन आजाराचे संपूर्ण जनावरांना लसीकरण करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.लम्पी स्कीनने ३६ हजार जनावरे दगावली. त्या पशुपालकांना ९४ कोटींची मदत केली. असा निर्णय घेणारेही महाराष्ट्र एकमेव राज्य आहे.गोपालन, कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन हे शेतीसाठी अधिक फायदेशीर असल्याने या पूरक व्यवसायाला अधिक चालना देण्याचे सरकार काम करणार आहे. राज्यातील ७० हजार शेतकरी कुक्कुटपालन करत आहेत.मात्र कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याने त्याबाबत शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी समिती केली. फसवणूक करणाऱ्या कंपन्यांची आता गय केली जाणार नाही. कुक्कुटपालन वाढीसाठी बिनव्याजी कर्ज देण्यात येईल.’’
‘भेसळीत एका मोठ्या दूध संघाचे नाव’
‘‘श्रीगोंद्यात दोन दिवसांपूर्वी दूध भेसळीबाबत कारवाई केली. तेव्हापासून साठ हजार लिटर दूध घटले. भेसळीचे दूध खरेदी करण्यात व अशा भेसळीला प्रोत्साहन देणाऱ्या एका मोठ्या दूध संघाचे नाव आले आहे.त्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल. राज्यात गो-सेवा वाढीसाठी आणि त्यातून संवर्धन होण्यासाठी गो-सेवा आयोगाचे विधेयक आणले आहे.कृत्रीम रेतनाबाबतही राज्य प्रगती करत आहे. नव्या रेतनामुळे ९५ टक्के गाई, म्हशी जन्माला येतील. शिर्डीत पशुवैद्यकीय महाविद्यालय करण्यात येत असल्याने पशुधन विकासाला चालना मिळेल,’’ असेही विखे म्हणाले.सत्तार म्हणाले, ‘‘पावसाने झालेल्या नुकसानीत शेतकरी हतबल आहे. मात्र सरकार शेतकऱ्यांसाठी काम करत असून नुकसानीची पंधरा दिवसांत भरपाई देण्यात येईल.’’