जागतिक बाजारात तेलाचा भडका !!
२ एप्रिल २०२३ रोजी सौदी अरेबिया आणि अनेक तेल उत्पादक देशांनी तेल उत्पादनात मोठी कपात करण्याची घोषणा केली. त्याचे परिणाम लगेच दिसून आले आहेत. आज कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढण्याची शक्यता आहे. कारण तेल उत्पादक देशांनी तेलाचं उत्पादन दिवसाला तब्बल 10 लाख बॅरेलनं कमी करण्याता निर्णय घेतला आहे. यामध्ये ओपेकसह रशिया-पुरस्कृत ओपेक-प्लस या संघटनेचा देखील समावेश आहे. बाजारात स्थैर्य यावं यासाठी आम्ही उत्पादन कमी करतोय, असं ओपेकनं म्हटलं आहे. तरी यामागचं खरं कराण वेगळं आहे. तेलाचे भाव वाढावेत, ज्यामुळे आपला नफा वाढेल, असा विचार आखाती देशांनी केला आहे. कारण कोरोनाकाळ संपल्यावर तेलाच्या मागणीत सातत्यानं वाढतच होत आहे. त्यात उत्पन्न कमी करण्याची काहीच गरज नाही. मात्र नफा वाढवण्याठी ओपेकनं उत्पादन कमी केलंय, असं तज्ज्ञ सांगत आहेत.
कच्च्या तेलाच्या किमती आज उच्चांकी पातळी गाठण्याची शक्यता आहे. वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड आज 8 टक्क्यांहून अधिक वाढले आहे. सौदी अरेबियानं म्हटलं आहे की, ते मे महिन्यापासून 2023 अखेरपर्यंत तेल उत्पादनात   दररोज पाच लाख बॅरलनं कपात करणार आहे. तसेच, सौदी अरेबियासह, इराणसारख्या इतर काही तेल उत्पादक देशांनीही तेल उत्पादनात एकूण 1.15 दशलक्ष बॅरल कपात करण्याची घोषणा केली आहे. तेल उत्पादक देशांनी उचललेल्या या पावलांमुळे आज तेलाच्या किमतींत जोरदार वाढ होताना दिसत आहे.
 
आज कच्चं तेल महागलं
सौदी अरेबियासह अनेक देशांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे जागतिक तेल बाजारात चांगलीच चलबिचल दिसून येत आहे. आज त्याचाच परिणाम तेलाच्या वाढत्या किमतींच्या रूपात दिसून येत आहे. या पावलाचं आणखी अनेक नकारात्मक परिणाम येत्या काळात दिसून येतील, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतींत जोरदार वाढ दिसून येते. सौदी अरेबियानं तेल बाजार स्थिर करण्याच्या उद्देशानं उचललेलं हे 'सावधगिरीचं पाऊल' असं म्हटलं असलं तरी यानंतर रियाध आणि अमेरिका यांच्यातील संबंधांमध्ये आणखी तणाव निर्माण होऊ शकतो. आधीच युक्रेन-रशिया युद्धामुळे संपूर्ण जगाला महागाईचा सामना करावा लागत आहे आणि आता तेल उत्पादनात घट झाल्यामुळे जागतिक चलनवाढीचा दर आणखी वाढण्याचा धोका आहे.
भारतावर काय परिणाम होणार? पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार?
सौदी अरेबिया आणि इतर तेल उत्पादकांनी तेल उत्पादनात एकूण 1.15 दशलक्ष बॅरल कपातीची घोषणा केली आहे आणि यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होणार आहे. त्याचा नकारात्मक परिणाम भारतावरही दिसू शकतो. पेट्रोल आणि डिझेलसारख्या तेल उत्पादनांच्या किमतींत वाढ होऊ शकते. भारतात पेट्रोल आणि डिझेलसाठी कच्च्या तेलाची उपलब्धता बहुतेक आयातीद्वारे भागविली जाते आणि महाग तेलामुळे देशाचे आयात बिल वाढेल, महागाई दर वाढेल आणि देशाची व्यापार तूटही वाढू शकते. महागाई कमी करण्याच्या प्रयत्नात असलेली देशाची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देखील व्याजदरात वाढ करू शकते.