आल्यातील तेजी कायम, कांद्याचे भाव वाढतील का?
१) सोयाबीनचे दर टिकून (Soybean Rate)
देशातील बाजारात सोयाबीनचे दर टिकून आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात वायद्यांमध्ये दर निचांकी पातळीवर पोचले. वायद्यांनी १४.०४ डाॅलर प्रतिबुशेल्सचा टप्पा गाठला. तर सोयापेंड ४२१ डाॅलरवर आहे. देशात मात्र सोयाबीनचा बाजार मागील दोन महिन्यांपासून कायम आहे.सोयाबीनला सरासरी प्रतिक्विंटल ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. देशातील सोयाबीनचे भाव पुढील काही काळ स्थिर राहतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
२) कापूस भावात नरमाई (Cotton Rate)
देशातील बाजारात कापूस दरात नरमाई पाहायला मिळाली. मे महिन्यातही कापसाची आवक सरासरीपेक्षा खूपच जास्त आहे. आवकेचा दबाव असल्याने दर कमी असल्याचं जाणकार सांगतात. कापसाला सरासरी ७ हजार ५०० ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.शेतकरी कापूस विकत असल्याचे पाहून उद्योगांकडूनही दर वाढवले जात नाहीत, असे जाणकारांनी सांगितले.
3) कलिंगडाला उठाव (Watermelon Rate)
दुपारी उन्हाचा चटका चांगलाच जाणवत आहे. ऊन वाढल्याने रसाळ फळांना मागणी वाढली. कलिंगडालाही चांगला उठाव आहे. पण महत्वाच्या कलिंगड उत्पादक भागात पावसाची हजेरी सुरु आहे. काही भागात गारपीटही होत आहे.त्यामुळे बाजरातील कलिंगड आवक मर्यादीत आहे. त्यामुळे सध्या कलिंगडाला प्रतिक्विंटल सरासरी ८०० ते १ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. कलिंगडाचे भाव पुढील काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
४) आल्यातील तेजी कायम (Ginger Rate)
बाजारात सध्या आल्याची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. राज्यातील पुणे, मुंबई आणि नागपूर बाजारात आल्याची आवक काहीशी अधिक दिसते. पण ही आवक सरासरीच्या तुलनेत कमीच आहे. तर इतर बाजारातील आवक २० क्विंटलपेक्षा कमीच आहे.त्यामुळे आल्याचे दर तेजीत आहेत. सध्या आल्याला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ते १३ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. आल्याचे भाव पुढील काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज आले बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.
५) कांद्याचे भाव वाढतील का? (Onion Rate)
देशातील बाजारात रब्बी हंगामातील कांदा आवक वाढत आहे. पण कांद्याला पावसाचा फटका बसत आहे. देशभरातील कांदा उत्पादक पट्ट्यात पाऊस पडत आहे. ऐन कांदा काढणीच्या काळात पाऊस दणका देत असल्याने कांद्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतोय.कांद्याची गुणवत्ता कमी झाल्याचा फटका दराला बसतो. पाणी लागलेल्या कांद्याची टिकवणक्षणता कमी होते. काही ठिकाणी तर जमिनित ओलावा जास्त असल्याने काढणीच्या कामात अडचणी येत आहेत. कांदा काढणी ठप्प होत आहे. तर अनेक ठिकाणी शेतात काढणी केलेला कांदा पावसात भीजत आहे.आता मुंबई apmc कांदा बटाटा घाउक बाजारात कंदाच्या दर ५ ते १० रुपये प्रतिकिलोने विक्री केला जात आहे.