धान खरेदी केंद्रांवर नियंत्रण कोण ठेवणार?, एकीकडे शेतकऱ्याला नाडायचं दुसरीकडे राईस मीलर्सला
गोंदिया : धान्याचा कोठार अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. प्रत्येक वर्षी धान घोटाळा झाल्याचे समोर येते. यामुळे धान घोटाळा आणि गोंदियाचे समीकरण हे काही आपल्यासाठी नवीन राहिलेला नाही. गोंदिया जिल्हा धान उत्पादक जिल्हा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात धान पिकाचे या ठिकाणी उत्पादन घेतले जाते. उत्पादित केलेला धान हा आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर खरेदी केला जातो. खरेदी केलेले धान्य राईस मील चालकांमार्फत मिलिंग करून तांदळाचा पुरवठा करण्यात येतो.
राईस मीलद्वारे खराब तांदळाचा पुरवठा झाल्याच्या अनेक तक्रारी असतात. पण यावेळी मात्र राईस मील चालकांनी कशाप्रकारे तांदूळ तयार करावा. तेही शासकीय नियमांना धरून. अशा पेचात आता राईस मीलचालक पडलेले आहेत.
काही ठिकाणी जळलेला धान
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये अनेक धान खरेदी केंद्रावर धान नाही. त्यामुळे धान केंद्रातील संचालक हे खराब धान कमी दरात खरेदी करतात. नवीन धान्य म्हणून राईस मील चालकांना धानाचा पुरवठा करण्यात आलेला आहे. धानाची प्रत्यक्षात पाहणी केली असता अनेक ठिकाणी खराब झालेला धान, जळलेला धान दिसला.
पोत्यातील धान्याला आले कोंब
एवढेच नाही तर अनेक पोत्यांना धानाचे कोंब आले असल्याचे पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे खराब धान खरेदी करणारे राईस मीलचालक संकटात सापडले आहेत. एवढंच नाही तर धान खरेदी संचालकही कोणाची ऐकत नाहीत. त्यामुळे राईस मील चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
धान खरेदी केंद्रांवर नियंत्रण कोण ठेवणार?
प्रशासन याकडे लक्ष देऊन चांगल्या प्रकारचे धान राईस मील चालकांना मिळावे. तसेच धान केंद्रावर नियंत्रण कशाप्रकारे ठेवता येईल. याबाबत धोरण आखण्याची गरज राईस मील चालक रवी अग्रवाल यांनी व्यक्त केली.
राईस मील चालकांना खराब झालेला धान पुरवण्यात आला. राईस मील चालकांना लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे राईस मील चालक संकटात सापडले आहेत. धान खरेदी केंद्र चालकांवर नियंत्रण ठेवणार कोण, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.