Nagpur अधिवेशन 2023: बच्चू कडू तुफान बोलले, असं भाषण तुम्ही कधीच ऐकलं नसेल
 
-अयोध्येचं मंदिर झालं, पण घामाचे भाव..’
-‘हम किसी के गुलाम नहीं’
-मला इथे बसताना लाज वाटते’
-बच्चू कडूंकडून सर्वपक्षीय आमदारांची कानउघाडणी
-आम्ही सर्व इथे शेपूट घालून उभे आहोत’
नागपूर: आमदार बच्चू कडू हे आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन आक्रमक झाले. “मी बऱ्याच सदस्यांचं भाषण ऐकताना पाहिलं की, बऱ्यापैकी सदस्य हे पक्षाच्या हिताचं बोलतात आणि शेतकऱ्याच्या हिताचं फार कमी बोलतात. पक्ष सांभाळून शेतकऱ्याचं बोलणं हे मतलबी बोलणं आहे. निव्वळ शेतकऱ्याच्या हिताचं बोलणं फार गरजेचं आहे. मी पाचवी-सहावी वर्गात होतो तेव्हा शरद जोशी यांची शेतकरी संघटनेची चळवळ सुरु होती. तेव्हा मातीच्या भींतीवर एक मागणी लिहिली जात होती, भीक नको, हवे कामाची दाम. हे भीक मागणं शेतकऱ्यांनी सरळसरळ नाकारलं होतं, शेतकऱ्याने घामाचे दाम मागितले होते. पण ते दाम अजूनही भेटत नाही, हे सू्र्यप्रकाशाएवढं स्वच्छ आहे”, असं बच्चू कडू म्हणाले.
अयोध्येचं मंदिर झालं, पण घामाचे भाव..’
“भाजपवाले असूदे, काँग्रेसवाले असूदे किंवा राष्ट्रवादीवाले असूदे, कुणीही असूदे त्यांच्यात शेतकऱ्याला योग्य दाम देण्याची धमक नाही आणि मानसिकतादेखील नाही. त्याचवेळी अयोध्येच्या राम मंदिराचं आंदोलन सुरु होतं. आम्ही शिवसेनेत असल्यामुळे त्या आंदोलनाला गेलो होतो. शेतकऱ्याच्या आंदोलनाचा प्रभाव वाढला होता. त्याचवेळी शेतकऱ्याच्या हाती भगवा झेंडा लागला होता. आता अयोध्येचं मंदिर झालं, पण घामाचे भाव भेटले नाहीत. धर्माचे प्रश्न सहज मिटून जातात. जातीपातीसाठी लोकं सहज उभे राहतात पण हक्काच्या लढाईमध्ये गेल्या 75 वर्षात कुणी उभं राहत नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे”, असं बच्चू कडू म्हणाले.
‘हम किसी के गुलाम नहीं’
“काँग्रेसचा आज मोर्चा दिसला ते पाहून मला चांगलं वाटलं. तुमच्या हाती शेतकऱ्याचा दंडा दिसला ते चांगलं वाटलं. स्वामिनाथन आयोग 2004 मध्ये स्थापन केलं. तेव्हा काँग्रेसचं राज्य होतं. काँग्रेसने आयोग स्थापन केला पण स्वीकारला नाही. या स्वामिनाथन आयोगाने दोन वर्षात सहा अहवाल सादर केले. हे सहा अहवाल सादर केल्यानंतर एकही विषय काँग्रेस आणि भाजपने पूर्ण केला नाही. तुम्ही मला पाठिंबा काढणारे सांगू शकत नाहीत. हम किसी के गुलाम नहीं”, असं बच्चू कडू रोखठोकपणे म्हणाले.
मला इथे बसताना लाज वाटते’
“स्वामिनाथन काय सांगत होते, 50 टक्के नफा धरुन भाव द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा यवतमाळला आले तेव्हा त्यांनी भाषणात तेच सांगितलं होतं. पण 50 टक्के नफा सोडा, पण आज भाव पाहिले तर, आम्ही 2022-23 मध्ये कापसाचे भाव 15 टक्क्याच्या नफ्याच्या हिशोबाने 8,886 रुपयांची शिफारस केली. तर केंद्र सरकारने 6380 भाव जाहीर केले. मंत्री गिरीश महाजन पाच वर्षांपूर्वी 6 हजाराच्या भावाची मागणी करत उपोषणाला बसले होते. आता 5 वर्षांनी त्यांची ही मागणी मान्य झालीय. एका क्विंटलमध्ये 2 हजार रुपयाचा फरक आहे. मग नफा काय? मला इथे बसताना लाज वाटतेय. हे सर्वच पिकांबाबत आहे”, असं बच्चू कडू म्हणाले.
बच्चू कडूंकडून सर्वपक्षीय आमदारांची कानउघाडणी
“आम्ही कोणत्या तोंडाने बोलायचं? आम्ही पक्षाचं आहे म्हणून बोलायचं की शेतकऱ्याचं आहे म्हणून बोलायचं? आमची सरळसरळ हिंमत नाही करत. कारण तिकीट मिळत नाही. कोणत्याही पक्षाचे असूद्या”, अशा शब्दांत बच्चू कडू यांनी सर्वपक्षीय आमदारांची कानउघाडणी केली.
“सगळे खर्च वाढले, पण आमचे भाव कमी झाले. धन्यवाद माना की, तुम्हाला लोकं फिरु देतात. कारण तुम्ही-आम्ही सर्व पक्षांनी सगळ्या लोकांना जाती-धर्मात गुंतवून ठेवलं. हिरव्या आणि भगव्या रंगात गुंतवून ठेवलं. तुम्ही शेतकऱ्याची फार व्यवस्थित फाळणी केली आहे. त्याच्या डोक्यात शेतकऱ्याचा विचारच येऊ देत नाहीत, इतके हुशार झाले राजकारणी लोकं की, जात एवढी आणि धर्म एवढा टाकला की त्यातून बाहेर येऊ देत नाही”, असं बच्चू कडू म्हणाले.
‘आम्ही सर्व इथे शेपूट घालून उभे आहोत’
“अतिवृष्टी झाली त्याची चर्चा केली जाते. पण सरकारने धोरणाने किती मारलं याची चर्चा होत नाही. कारण धोरण हे पक्ष, पक्षातलं सरकार ठरवत असतं आणि आमची पक्षाविरोधात बोलायची औकात नाही. आम्ही सर्व इथे शेपूट घालून उभे आहोत. काँग्रेसच्या काळातही तेच होतं आणि आताही तेच सुरु आहे”, असं बच्चू कडू म्हणाले.
“पेट्रोल, डिझेलचे भाव वाढले, पण शेतमालाला भाव नाही. 400 चं खत 1300 रुपयाला होतं आणि तुम्ही भिकार** योजना आणताय. कोणत्या योजना काय, दोन रुपये किलो गहू द्या, अशी भिकार** योजना द्या म्हणून कोणी सांगितलं? अरे लुटायचं क्विंटलाने आणि द्यायचं किलोने?”, असा सवाल बच्चू कडू यांनी केला.
‘लाज वाटत नाही का?’
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं की, मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया. मग आमचा कांदा मेड इन इंडियात बसत नाही का? ही घोषणा कांद्यासाठी का लागू होत नाही? आमच्या भारतातील सर्व गोष्टी बाहेर कशा जातील, असं बोलायचं आणि कांद्याला निर्यातबंदी करायची, का? शहरातील लोकं लट घेऊन बसले आहेत म्हणून? घाबरावतात त्यांना? लाज नाही वाटत का? कांदा महाग झाल्यावर मरत नाही कोणी, काहीही खा, मरतं का?”, असं बच्चू कडू म्हणाले.
“कांद्यावर निर्यातबंदी सरकारला माहीत होतं, निर्यातशुल्क वाढवलंच, त्यापाठोपाठ किती निर्णय सरकारने घेतले, मी सरकारमध्ये आहे, मीही पाठिंबा दिला. पण बापासोबत बेईमान व्हाव की पक्षासोबत व्हावं? शेतकऱ्यासोबत बेईमानी कराल की पक्षासोबत? माझ्या आईने सांगितलं की, पक्षासोबत बेईमानी केली तरी चालेल पण शेतकऱ्यासोबत करु नको”, असं बच्चू कडू म्हणाले.
‘…म्हणून आरक्षणाच्या मागण्या वाढल्या’
“कांद्याने अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार पाडलं. कांद्यावर निर्यातबंदी ही इंदिरा गांधी यांच्यापासून होत आहे. कारण खाणाऱ्याचा विचार होतोय. चांगले शेतमाल भेटला तर आम्हाला आरक्षणाची गरज नाही. पण शेतकऱ्याचं भलं करता आलं नाही म्हणून आरक्षणाच्या मागण्या वाढत चालल्या आहेत”, अशी भूमिका बच्चू कडू यांनी मांडली.