Kolhapur AI Technology: AI तंत्रज्ञानाद्वारे ऊस शेती; जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

कोल्हापूर: जिल्ह्याच्या राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा येथील युवराज वारके यांच्या ऊस शेतात ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या तंत्रज्ञानाला जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकयन एस. यांनी (ता.१८) भेट दिली. जिल्हाधिकारी येडगे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी सुमारे तासापेक्षा जास्त कालावधी वारके यांच्या शेतामध्ये तंत्रज्ञाची माहिती घेतली. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक नवी वाट, नवी दिशी देणारी असेल. मजरे कासारवाडा गावचा संकल्पपूर्ती प्रकल्प म्हणजे एक ब्रँड अॅम्बेसिडर म्हणूनच पुढे येईल. याचा आदर्श सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा,' असे जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी शेतीतील वेगवेगळ्या प्रयोगांची माहिती घेतली. "एआयच्या माध्यमातून आपल्याला आपल्या शेतीमधील माती, खतांची, वातावरण बदलाची माहिती आणि नेमकी गरज काय आहे, याची माहिती मिळणे शक्य झाले आहे. तसेच जमिनीत जो सेन्सर लावण्यात येतो, त्यातून जमिनीचा ओलावा, तापमान आणि बदल याची माहिती मिळते. महत्त्वाची बाब म्हणजे सॅटेलाइटद्वारे मॉनिटरिंग केली जाते आणि याबाबत सातत्याने शेतकऱ्यांना अलर्ट केले जाते". अशी माहिती वारके यांनी दिली.
यावेळी जिल्हाधिकारी येडगे म्हणाले की, "बदलता काळ व बदलते तंत्रज्ञान बघता कृत्रिम बुद्धिमता (ए.आय.) ही केवळ एका ठराविक क्षेत्राची किंवा एकाच वर्गापुरता सीमित राहिलेली नाही. राज्यातील सर्वसामान्य शेतकरी वर्गासाठी नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाची व विकासाची नवीन संधी उपलब्ध झाली आहे". असे येडगे म्हणाले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., तहसीलदार अनिता देशमुख, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे, तालुका कृषी अधिकारी रमेश गायकवाड, मंडल कृषी अधिकारी दिलीप आदमाप्पुरे, कृषी पर्यवेक्षक के. एस. कोंडे, कृषी सहायक युवराज सावंत, प्रदीप गोगाने, जयदीप पाटील, कृष्णात जाधव, कृष्णात एकल, प्रकल्प व्यवस्थापक 'आत्मा'चे सुनील कांबळे, तालुका कृषी आत्मा समितीचे सदस्य सचिन वारके, सरपंच योगिता वारके, आदीसह गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.