Maharashtra Budget 2025 : कसा आहे राज्याचा अर्थसंकल्प? 5 मुद्यातून समजून घ्या संपूर्ण बजेट!

मुंबई : राज्यात 2024 मधील विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दमदार यश मिळवलं. या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प कसा आहे हे समजून घेऊया 1 मुंबईकरांसाठी मोठी तरतूद मुंबई आणि परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासाठी या अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आली आहे. मुंबईत सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापारी केंद्रे निर्माण करण्यात येणार आहेत. कुर्ला, नवी मुंबई, वांद्रे-कुर्ला संकुल, खारघर आणि विरार - बोईसर या सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्रे निर्माण केली जाणार आहेत. त्याचा मुंबईच्या विकासाला मोठा फायदा होणार आहे.
मुंबईतील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी ६४ कोटींचा प्रस्ताव या बजेटमध्ये सादर करण्यात आला आहे. मुंबई उपनगरातील वाहूतक जलद करण्यावर या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. त्यामध्ये वर्सोवा ते मढ खाडीपूल, वर्सोवा ते भाईंदर किनारी मार्ग, मुलुंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरिवली, ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग असे 64 हजार 783 कोटींचे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत.
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं 85 टक्के काम पूर्ण झालंय. त्याचबरबोर ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उन्नत मार्ग नियोजित आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण ही महत्त्वाची शहरं आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यात येणार आहेत, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी या बजेटमध्ये केली.
2 लाडक्या बहिणींना काय मिळालं? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सुमारे 2 कोटी 53 लाख लाभार्थी महिलांना 33 हजार 232 कोटी रुपये निधीचे वाटप, सन 2025-26 मध्ये या योजनेकरीता एकूण 36 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 2025-26 मध्ये आणखी 24 लाख महिलांना लखपती दीदी करण्याचे उद्दीष्ट आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची राज्यात प्रभावी अमंलबजावणी करण्यात येणार असून मुलींचा व्यावसायीक शिक्षणात सहभाग वाढविण्या करीता शिक्षण आणि परिक्षा शुल्काची 100 टक्के रक्कम सरकारकडून भरली जाणार आहे.
3 स्मारकांसाठी तरतूद छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान स्थळ असलेल्या मौजे तुळापूर आणि समाधीस्थळ मौजे वडूबुद्रुक येथे त्यांच्या स्मारकाचं काम प्रगतिपथावर आहे. त्याचबरोबर कोकणातल्या संगमेश्वरमध्ये देखील छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक राज्य सरकारकडून उभारलं जाणार आहे. पुण्यातील आंबेगाव येथे चार टप्प्यात भव्य शिवसृष्टी उभारणी सुरु आहे. त्यामधील दोन टप्प्यातील कामं पूर्ण झाली आहेत. तर उर्वरित दोन टप्प्यांसाठी सरकार 50 कोटी देण्यात येणार आहेत.
कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धीमतेचे धोरण राबवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना पिकांचे नियोजन करण्यासाठी, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी, उत्पादन वाढवण्यासाठी तसेच शेतीमालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी एआयचा वापर होईल.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत 2 लाख 13 हजार 625 लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या दोन वर्षांसाठी 255 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
मोटार वाहन कराची कमाल मर्यादा यापूर्वी 20 लाख होती. ती आता 30 लाख रुपये करण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात सादर करण्यात आला आहे. या वाढीमुले 2025-26 या आर्थिक वर्षात सुमारे 170 कोटींचा अतिरिक्त महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.
वैयक्तिक मालकीच्या सीएनजी,एलपीजी कारवरील वाहन कर एक टक्क्याने वाढवणार, दीडशे कोटींचा अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे.
क्रेन, कॉम्प्रेसरवर 7 टक्के वाहन कर, 180 कोटींचा अतिरिक्त महसूल अपेक्षित आहे.
एलजीव्ही, हलक्या वाहनांवर ७ टक्के वाहन कर. सुमारे 625 कोटींचा अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित
एकाच व्यवहारासाठी एकापेक्षा जास्त दस्तावेजांचा वापर केल्यास, पूरक दस्तावेजांना 100 ऐवजी 500 रुपये मुद्रांक शुल्क आकारणार.