या जिल्ह्यात कोसळला ढगफुटी सदृश्य पाऊस, ३० वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक
यवतमाळ : नेर तालुक्यातील ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला. गेल्या तीस वर्षातला हा रेकॉर्डब्रेक पाऊस असल्याचे सांगितले जाते. शेतकऱ्यांनी जमिनीत बी बियाणे पेरले होते. मात्र तो रात्री झोपेत असतानाच त्याने पेरलेली बी बियाणे पुरात वाहून गेले. शेतात मातीसह दगडी चिखल झालाय. पावसाने सावरगाव शिवारातील शेतकरी उघड्यावर आलेत. आता बांधावरील बळीराजापुढे मोठे संकट कोसळले आहे.
१६ हेक्टर जमीन खरडली
पावसाने सावरगाव, गोळेगाव , ब्राह्मनवाडा, शिरजगाव,पांढरी, पिंपळगाव काळे शिवारातील जवळपास 114 हेक्टर जमिनीवरील पिके पूर्णतः उद्ध्वस्त झालीत. १६ हेक्टर जमीन खरडून गेली. ती दुरुस्त करण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे.
सोयाबीन, तूर, कापसाचे नुकसान
गेल्या वर्षीची अतिवृष्टी, नापिकी यातून शेतकरी सावरत नाही तोच यंदा मुसळधार पाऊस पडला. शेतातील सोयाबीन, तूर, कापूस आदी पिके पावसाने नाहिसी केली. नाल्याचे काठावर शेती असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
लाखो रुपयांचे नुकसान
साखळी नदीला जोडणारा नाला फुटला. त्याचे पाणी शेतात शिरले आणि पिके वाहून गेली. सावरगावातील शेतकऱ्यांची सुमारे वीस एकर शेतीतील पिकासह माती खरडून गेली. यात या शेतकऱ्यांचे बी, बियाणे, खते, मजुरी असे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शिवाय माती खरडून गेल्याने जमीन पडीत पडली आहे.
शेतकऱ्यांपुढे पडला प्रश्न
या पावसाचा जोरदार फटका सावरगावातील शेतकऱ्यांना बसला. आता बियाणे घ्यायला पैसे आणायचे कुठून आणायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला. मुलाचे शिक्षण, मुलीचे लग्न, औषधोपचार कसा करायचा? असे बरेच प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहेत.
वाशिम जिल्ह्यात सततच्या पावसाने रिसोड तालुक्यातील नेतनसा येथील शेतशिवार परिसरातील कच्च्या रस्त्यावरील पुलाचा मोठ्या प्रमाणात काही भाग खचला. त्यामुळे रस्त्यावरून जाणारी एक बैलगाडी बैलासह नालीत पडली. बैल नालीच्या पाईपमध्ये अडकला असून, गंभीर जखमी झाला आहे. त्या अडकलेल्या बैलाला काढण्यासाठी गावकऱ्यांकडून शर्यतीचे प्रयत्न सुरू आहेत.