हिंगोली हळद मार्केट यार्डात २२० वाहनांच्या रांगा, लिलाव, वजनासाठी चार दिवसांची प्रतीक्षा, वाढलेल्या दराने शेतकऱ्यांना दिलासा
हिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हळद मार्केट यार्डात हळदीची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने बाजार आवारात २२० हून अधिक वाहने रांगेत उभी आहेत. वाढलेल्या आवकेमुळे लिलाव प्रक्रिया आणि वजनकाट्यावर मालाचे वजन करण्यासाठी तब्बल चार दिवसांचा कालावधी लागत असून, शेतकरी व व्यापाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
दरम्यान, हळदीच्या दरात झालेल्या वाढीमुळे उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एप्रिल, मे आणि जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हळदीला प्रतिक्विंटल सरासरी ११ हजार ५०० ते १३ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळत होता. मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून बाजारात तेजी आली असून, प्रतिक्विंटल एक ते दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. सध्या हिंगोली मार्केट यार्डात हळदीला १३ हजार ते १५ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळत असून, दर्जेदार हळदीला १६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.
रविवारी दुपारपर्यंत सुमारे २२० वाहने हळद घेऊन बाजारात दाखल झाली होती. या सर्व वाहनांतील हळदीचा लिलाव आणि वजनकाट्यावरील प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जवळपास चार दिवस लागू शकतात. पावसाळ्यामुळे हळद भिजून नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी नियोजन करूनच माल बाजारात आणावा, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.
संपतराव मुंढे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगोली म्हणाले, “सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने हळद भिजल्यास नुकसान होऊ शकते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना हळद विक्रीसाठी आणायची आहे, त्यांनी तीन ते चार दिवसांनी माल आणावा. शेतकऱ्यांचा मुक्काम वाढू नये आणि त्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी बाजार समिती प्रशासन आवश्यक ती खबरदारी घेत आहे.”