राज्यात दुष्काळाचे चटके! ५ ऑक्टोबरपासून पंचनामे, पिकांच्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण
पावसाच्या दीर्घ खंडामुळे खरीप संकटात पंचनाम्यांपूर्वीच टंचाई निवारणाच्या उपाययोजना सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : राज्यात मोसमी पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने खरीप हंगामावर संकट ओढावले आहे. अनेक भागांत पावसाचा मोठा खंड पडल्याने पिकांची स्थिती चिंताजनक बनली असून, संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ ऑक्टोबरपासून दुष्काळी स्थितीचे पंचनामे सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
पंचनामे सुरू होण्यासाठी ऑक्टोबरची वाट न पाहता टंचाई निवारणाच्या उपाययोजना तातडीने सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. पावसाची तूट असलेल्या भागांमध्ये पिकांचे सर्वेक्षण करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याच्या दृष्टीने प्रशासनाला कार्यवाही करण्यास सांगण्यात आले आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड ३० दिवसांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मूग यांसह विविध खरीप पिकांवर परिणाम झाला आहे. काही भागांत पिके करपण्याची स्थिती निर्माण झाली असून, पाणीटंचाईचाही प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे सोमवारपासून मराठवाड्यातील तसेच इतर दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. अकोला, वाशिम, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांपासून पाहणीला सुरुवात होणार असून, त्यानंतर अहिल्यानगर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार आहे.
दरम्यान, देशातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला १९ सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानातून सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागाच्या अंदाजात व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांतील पाऊस खरीप पिकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.