Rajma Rate:लातूरमध्ये सोयाबीनपेक्षा राजमाला दुप्पट दर

लातूर: लातुर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारात मागील पाच दिवसांपासून सोयाबीनला पर्याय म्हणून घेतलेल्या राजमाला चांगला दर मिळत आहे. दुपटीने अधिक दर मिळत असतनाच पाच दिवसांत राजमाने उसळी घेतली असून साडेआठ हजार रुपये क्विंटलचा भाव नऊ हजार क्विंटलपर्यंत गेला आहे.
या स्थितीत सोयाबीनचा भाव चार हजार तीनशे रुपयांपर्यंतच स्थिर असून हमीभाव केंद्राच्या आशा संपुष्टात आल्याने सोयबीनची बाजारातील आवकही वाढू लागली आहे. बाजारात दररोज नऊ ते दहा हजार क्विंटलने सोयाबीनची आवक होत असून राजमाचीही आवक पाचशे क्विंटलच्या घरात गेली आहे.
सहा फेब्रुवारीला हमीभाव केंद्रावरील सोयाबीनची खरेदी बंद झाली. त्यानंतर खरेदीला मुदतवाढ मिळण्याची आशा शेतकऱ्यांना होती. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेत हमीभावाच्या खरेदीला मुदतवाढीची प्रतीक्षा केली. मात्र, काही दिवसांपासून मुदतवाढीच्या आशा मावळल्या असून शेतकऱ्यांनी आता सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणायला सुरुवात केली आहे.
यातूनच पाच हजार क्विंटलपर्यंत घसरलेली आवक सात दिवसांत दहा हजार क्विंटलच्या पुढे गेली आहे. या स्थितीत सोयाबीनचे भाव स्थिर असून सोायबीनला किमान दर ४००० तर कमाल दर ४२०० प्रति क्विंटल मिळत आहे. दुसरीकडे सोयाबीनचे भाव गेल्या तीन वर्षांत वाढत नसल्यमुळे सोयाबीनला पर्याय म्हणून स्वीकारलेल्या राजमाला चांगला भाव आला आहे. खरिपात घेतलेल्या राजमाला चांगला भाव मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी रब्बीतही या पिकाला प्राधान्य देत उसामध्ये आंतरपीक घेतले आहे.
यातच बाजारात राजमाची आवक सुरू होताच त्याने चांगला भाव खायला सुरुवात केली आहे. मागील मंगळवारी (ता. ११) बाजारात ३८९ क्विंटल आवक होऊन राजमाला किमान ८३०० ते कमाल ८५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. तर शनिवारी (ता. १५) ४८० क्विंटल आवक होऊन किमान दर ९४०० तर कमाल दर ९७०० रुपये मिळाला होता. यामुळे राजमाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आवक वाढल्यास भाव कमी?
धाराशिव जिल्ह्यात मोठ्या संख्येने शेतकरी राजामाचे पीक घेतात. शंभर दिवसांचे हे पीक असून चार ते सात पाण्याच्या पाळ्यात ते येते. काही वर्षांत राजमाच्या खरेदीदारही मोठ्या संख्येने बाजारात तयार झाले असून लातूर जिल्ह्यात दोन वर्षांपासून शेतकऱ्यांनी राजमाची मोठ्या प्रमाणात कास धरली आहे. आता राजमाला चांगला भाव मिळत असला तरी आवक वाढल्यास भाव कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.